Type Here to Get Search Results !

तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश , गुन्हे शाखेची कारवाई; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

 पनवेल । स्वस्त सोन्याच्या आमिषाने सांगलीतील व्यापार्‍याला खारघर मध्येबोलावून, स्वतःला पोलीस असल्याचे भासवत 13 लाख 25 हजारांची रोकड लुटणार्‍या तोतया पोलिसांच्या टोळीचा नवी मुंबई गुन्हे शाखेने यशस्वीरित्या पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 15 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 
या टोळीत सहभागी असलेल्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या गुन्ह्यातील टोळीने सांगली येथील साखर व्यापारी मनिष शिंदे यांना स्वस्त दरात सोनं उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून शिंदे यांनी व्यवहारासाठी होकार दिला. त्यानुसार 12 जानेवारी रोजी ते 13 लाख 25 हजार रुपयांची रोकड घेऊन खारघर परिसरात आले होते.
 
याचवेळी आधीच सापळा रचून बसलेल्या टोळीतील लुटारु कारमधून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत शिंदे यांच्यावर धाड टाकल्याचा बनाव केला आणि चौकशीच्या नावाखाली त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून घटनास्थळावरुन पलायन केले. या घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारुंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नवी मुंबई गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली.
 
गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे निष्पन्न झाले. तसेच काही आरोपी मोटारसायकलवरुन कारला साथ देत असल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषण , सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने विशाल तुपे, रोहित शेलार आणि मनोज भंडारी या तिघांना नवी मुंबई व कल्याण परिसरातून अटक केली.
 
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी, विविध मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा एकूण 15 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या प्रकरणातील फरार इसमांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
 

Post a Comment

0 Comments