प्रतिनिधी / पुणे :'भरून आलेले आभाळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह पुणे आणि परिसरात सोमवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. बाणेरसह काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. रविवारपासून उकाडा प्रचंड वाढलेला असताना पावसाच्या सरींनी तापमानात काही प्रमाणात घट होऊन दिलासा मिळाला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जेट स्ट्रीम म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात पाच ते दहा किमी अतंरावरून पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड हवेचा झोत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वाहत आहे. हा थंड हवेचा झोत सरळ न वाहता वर-खाली नागमोडी पद्धतीने वाहत आहे. विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येणार आहेत. परिणामी, वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ५० किलोमीटर राहील.
बाष्पयुक्त वारे थंड हवेत मिसळतील, ही स्थिती पाऊस आणि गारपीट होण्यास पोषक असते, असे स्पष्ट करत भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्याच्या बहुतांश ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासूनच उकाडा वाढला होता. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. दुपारी दोन वाजल्यानंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली.
आकाश ढगांनी व्यापले, अंधारून आले.
ढगांच्या गडगडाटासह शहराच्या मध्यवर्ती भागात दुपारी तीनच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या.
सोसाट्याच्या वाऱ्याने मोठ्या प्रमाणात धुळ उडाली. त्यापूर्वी बाणेरसह काही ठिकाणी गारा पडण्यासह जोरदार पाऊस झाला.

Post a Comment
0 Comments